मालवण : (प्रतिनिधी)
कोळंब ग्रामपंचायतीतील कारभाराच्या अनियमिततेबाबत व अपहारप्रकरणी प्रशासनाकडून होत नसलेल्या ठोस कारवाईच्या विरोधात कोळंबचे उपसरपंच विजय नेमळेकर यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ रोजी सुनावणी होणार आहे. नेमळेकर यांच्यावतीने अॅड. आनंद वराडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे दावा दाखल केलेला असून यात थेट राज्य शासनाला प्रतिवादी करण्यात आलेले आहे.
कोळंबचे उपसरपंच विजय नेमळेकर यांनी आपल्या दाव्यात कोळंब ग्रामपंचायतीतील गेल्या अडीच वर्षात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, बनावट दस्तऐवज निर्मिती, सरकारी नोंदवहीत फेरफार, सभांच्या इतिवृत्तातील खोटेपणा, ग्रामसभा न न घेणे तसेच निधी अडवून ठेवणे अशाबाबत न्यायालयाकडे दाद मागितली आहे. यामध्ये त्यांनी ठेकेदाराने दिलेल्या बॉण्डपेपरवर एक तारीख असताना त्याच कागदावर दुसरी तारीख घालून सही व शिक्का मारून खोटा करारनामा तयार केल्याचा आरोप केला आहे. गावातील एका रस्त्याची लांबी कमी असताना शासकीय रेकॉर्डवर त्या रस्त्याची लांबी जास्त करण्यात आलेल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. एका सभेला उपसरपंच स्वतः उपस्थित नसतानाही त्यांच्या उपस्थितीत सभा झाल्याचे दाखवून खोटे इतिवृत्त लिहिण्यात आलेले आहे. २६ जानेवारी रोजीची ग्रामसभा न घेणे, अजेंडा सार्वजनिक ठिकाणी न लावणे, असे आरोप आहेत. गटविकास अधिकारी यांनी संबंधितांना चौकशीत दोषी ठरवून त्यांना अपहाराची रक्कम भरण्याची नोटीस देऊनही अद्यापही कारवाई झालेली नसल्याने आपण थेट उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्री. नेमळेकर म्हणाले.
कोळंब गावातील ग्रामपंचायतीतील विषय आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आल्याने गावातील राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहिले आहे. उच्च न्यायालयातून आपल्याला न्याय मिळण्याचा दावा उपसरपंच विजय नेमळेकर यांनी केला आहे.







