कणकवली : देशभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला असून, व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल्सना शटर खाली ओढावे लागले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर कोकणातील कणकवलीजवळील वागदे येथील हॉटेल विश्रांतीने चुल पेटवत पर्यटकांच्या क्षुधाशांतीची जबाबदारी समर्थपणे उचलली आहे.
गॅसअभावी अनेक ठिकाणी जेवणाची गैरसोय होत असताना, हॉटेल विश्रांतीमध्ये मात्र पारंपरिक मातीच्या चुलीवर स्वयंपाक सुरूच आहे. लाकडांच्या ज्वाळांवर तयार होणारे अस्सल मालवणी पदार्थ पर्यटकांना केवळ चवच नाही, तर संकटाच्या काळातही दिलासा देत आहेत.
हॉटेल चालकांनी परिस्थितीसमोर हार न मानता पारंपरिक पर्याय स्वीकारत व्यवसाय सुरू ठेवला आहे. “गॅस नाही म्हणून हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा, चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांची सेवा करणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे वागदे परिसरात येणाऱ्या पर्यटकांची भूक भागवण्यासोबतच कोकणच्या पारंपरिक स्वयंपाकपद्धतीचेही जतन होत आहे. संकटातही मार्ग काढत सेवा देण्याची ही जिद्द इतर हॉटेल व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
परिणामी, गॅस टंचाईच्या कठीण काळात हॉटेल विश्रांती हे नाव पर्यटकांसाठी विश्वास आणि दिलास्याचे केंद्र बनले आहे.







