Ganesh Satardekar from Malvan qualifies for the prestigious Bharat Shree national bodybuilding championship after an impressive performance in the Maharashtra Shree competition, marking a proud moment for Sindhudurg athletes.
मालवण (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आयोजित मानाच्या ‘महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मालवण नगरपरिषद व्यायामशाळेचा खेळाडू गणेश हनुमंत सातार्डेकर याने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. ६० ते ६५ किलो वजनी गटात महाराष्ट्रातून टॉप टेनमध्ये स्थान मिळवत त्याने टॉप सिक्समध्ये प्रवेश करून सहावा क्रमांक पटकाविला.
याचबरोबर ६५ ते ७० किलो गटातील बॉडी बिल्डिंग आणि क्लासिक फिजिक प्रकारातही सातार्डेकरने टॉप टेनमध्ये स्थान मिळवत सातवा क्रमांक मिळविला. या कामगिरीच्या जोरावर त्याची पुणे येथे २८ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या मानाच्या ‘भारत श्री’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेनंतर सातार्डेकर याला रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, कुडाळ येथील एम्पायर जिमचा खेळाडू जयप्रकाश उर्फ बाळा नार्वेकर यानेही ७० किलो वजनी गटात टॉप टेनमध्ये स्थान पटकाविले. तसेच मास्टर गट (४० वर्षांवरील) प्रकारात त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सातार्डेकर याला प्रवीण हिंदळेकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर नार्वेकर यांना एम्पायर जिमचे प्रथमेश केळबाईकर यांचे मार्गदर्शन मिळाले. सिंधुदुर्ग संघाचे व्यवस्थापक म्हणून महेश परब यांनी जबाबदारी सांभाळली.
भारत सरकार मान्यता प्राप्त संघटनेतर्फे आयोजित या मानाच्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर कांबळी, सचिव तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच किशोर शांताराम सोन्सूरकर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी भविष्यात मालवणमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याबाबतही राष्ट्रीय अध्यक्ष संजय मोरे यांच्याकडे मागणी करण्यात आली.







