भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू कोणाला स्वखुशीने ही हस्तलिखिते राज्य शासनाकडे सुपूर्द करावयाची झाल्यास शासन ती स्वीकारेल.
भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे, या दृष्टीने केंद्र शासनाने ‘ज्ञानभारतम्’ या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.
आपल्याकडे जर काही हस्तलिखिते उपलब्ध असतील तर त्याची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल ॲप वर अपलोड करावी व या राष्ट्र कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.







