A Shahadat program was organized in Malvan by Youth for Bharat to mark the 350th martyrdom anniversary of Guru Tegh Bahadur, highlighting his sacrifice for protecting Kashmiri Pandits and Hindu faith.
मालवण (प्रतिनिधी)
इतिहासात हिंदू धर्म रक्षणासाठी शीख धर्मियांचे योगदान महत्वाचे आहे. म्हणूनच हिंदू व शीख हे एकत्र आहेत. काश्मिरी पंडीतांवर मुघलांकडून अत्याचार होत असताना त्यांच्या रक्षणासाठी शिखांचे नववे गुरु तेग बहादूर सिंग यांनी दिलेले बलिदान महत्वपूर्ण आहे. गुरु तेग बहादूर सिंग यांच्या बलिदानाचे स्मरण हिंदूंनी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते व प्रवचनकार श्रीनिवास दिनकर पेंडसे यांनी केले.
शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवण या संस्थेतर्फे मालवणात शहादत कार्यक्रम पार पडला. यानिमित्त मालवण शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. तर दैवज्ञ भवन येथे शहादात कार्यक्रम संपन्न होऊन संगमेश्वर येथील व्याख्याते व प्रवचनकार श्रीनिवास दिनकर पेंडसे यांचे व्याख्यान झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु तेग बहादूर सिंग, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, व्याख्याते श्रीनिवास पेंडसे, युथ फॉर भारत संस्थेचे संयोजक चेतन आजगावकर आदी उपस्थित होते. संयोजक श्री. आजगावकर यांनी मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
यावेळी श्रीनिवास पेंडसे म्हणाले, गुरु तेग बहादूर सिंग यांनी देशाच्या चारही कोपऱ्यात जाऊन जागरूकतेचे काम केले झ लोकांना जागते ठेवले. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच इतिहास जागता ठेवला पाहिजे, शीख धर्माबद्दल आपण सन्मानाने वागले पाहिजे. हिंदू धर्म टिकविण्यासाठी हिंदूंनी एकत्र येत राहिले पाहिजे, चर्चा व विचार विनिमय करून आपल्यातील दोष बाजूला सारले पाहिजे, भेदाच्या भिंती बाजूला केल्या पाहिजेत, भेद, जाती, संप्रदाय विसरून आपण हिंदू आहोत या एकाच विचाराने आपण जगले पाहिजे असेही श्री. पेंडसे म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी गुरु तेग बहादूर सिंग यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या बलिदानाची जाण ठेवत त्यांचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. आभार मोरेश्वर गोसावी यांनी मानले. शेवटी भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय व आयटीआयच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण वंदे भारत गीत सादर केले.
यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक रविकिरण तोरसकर, नरसेविका महानंदा खानोलकर, भाऊ सामंत, भूषण साटम, सौगंधराज बादेकर, प्रा. पवन बांदेकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, अमेय नाईक, प्रविणा शिंदे, अमृता फाटक, आयटीआयच्या सौ. लहाने, ज्योती तोरसकर, प्रा. चंद्रकांत गोखले, अमित भगत, रत्नाकर कोळंबकर, प्रा. हंबीरराव चौगले, मंदार बागलकर, शैलेश खाडिलकर, विष्णू निगुडकर यांच्यासह संस्थेचे सदस्य, मंदार सांबारी, ज्येष्ठ समीक्षक विनायक कोळंबकर, ऍड. हेमेन्द्र गोवेकर, वैभव पाटील , उमेश हडकर, श्री. अवसरे, शीख बांधव, मालवणसह जिल्ह्यातील नागरिक तसेच भंडारी कनिष्ठ महाविद्यालय, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व आयटीआय मालवणचे विद्यार्थी उपस्थित होते







