A political dispute erupted in Malvan after attempts were made to remove a stall in Bharad area. Shiv Sena (Shinde faction) leader Baban Shinde criticized corporator Mahendra Mhadgut over the issue.
मालवण (प्रतिनिधी):
मालवण शहरातील भरड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत असलेल्या स्टॉलच्या उभारणीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या शिवसेनेचे कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगूत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बबन शिंदे यांनी म्हटले की, भरड भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत असलेला आपला स्टॉल हटविण्याचा प्रयत्न हा हेतूपुरस्कर आणि पक्षीय द्वेषातून करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या महेंद्र म्हाडगूत यांना याच कारणामुळे मतदारांनी दहा वर्षे घरी बसविले होते, असेही त्यांनी म्हटले.
स्टॉल उभारणीवरून वाद
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी काल मालवणच्या भरड भागात सुरू असलेली स्टॉल उभारणी रोखली होती. यावर प्रतिक्रिया देताना बबन शिंदे म्हणाले की, मालवण शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब व्यावसायिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, महेंद्र म्हाडगूत आणि काही नगरसेवकांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्टॉलवर करण्यात आलेली कारवाई पक्षपाती असून त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
‘नगरपालिकेचा संबंध नाही’ – शिंदे
बबन शिंदे यांनी सांगितले की, मालवण–कसाल रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे नगरपालिकेचा या ठिकाणाशी संबंध नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या स्टॉलवर कारवाई करण्याचा अधिकार नगरपालिकेला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच रस्ता रुंदीकरणाच्या वेळी आपण स्वतःच्या खर्चाने स्टॉल हटविण्यास तयार आहोत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले आहे. याशिवाय आपण नगरपालिकेचा गुमास्ता कर आणि बाजार कर नियमित भरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील निवडणुकीत मतदार निर्णय देतील
महेंद्र म्हाडगूत यांच्यावर टीका करताना बबन शिंदे म्हणाले की, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मतदार पुढील निवडणुकीत पुन्हा त्यांना घरी बसवतील, असा इशाराही त्यांनी दिला.







