A tourist’s Mahindra Thar got stuck in the sand and seawater at Dandi beach in Malvan while performing stunts. The vehicle was later pulled out with the help of locals.
मालवण (प्रतिनिधी):
मालवणच्या दांडी बीच येथे समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करताना पर्यटकांची महिंद्रा थार कार समुद्राच्या पाण्यात आणि वाळूमध्ये रुतून अडकली. अखेर स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि नागरिकांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली.
गेल्या काही दिवसांत मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून कार आणि मोटारसायकलद्वारे स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. आज दांडी किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याजवळ स्टंट करण्याचा प्रयत्न करत असताना एका पर्यटकाची थार कार वाळूमध्ये खोलवर रुतून बसली.
स्थानिकांच्या मदतीने गाडी बाहेर
गाडी पाण्यात अडकल्यामुळे पर्यटकांना ती बाहेर काढणे कठीण झाले. अखेर स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि नागरिकांनी मदत करत गाडी पाण्याबाहेर काढली.
या घटनेदरम्यान काही पर्यटक अडकलेल्या गाडीसोबत फोटो व सेल्फी काढताना देखील दिसून आले.
वारंवार घडत आहेत अशा घटना
मालवण किनाऱ्यावर यापूर्वीही कार आणि बस समुद्राच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक मच्छिमार आणि पर्यटन व्यावसायिकांकडून वारंवार सूचना देऊनही अनेक पर्यटक भरती-ओहोटीचा अंदाज न घेता वाहनांसह किनाऱ्यावर धोकादायक स्टंट करताना दिसतात.
प्रशासनाने कारवाई करावी – मागणी
किनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी वाढत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बंदर विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.







