मालवण दि प्रतिनिधी
नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यातून मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त मसुरे डांगमोडे श्री देव रवळनाथ मंदिर नजीक मैदानावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर गिरोबा स्पोर्ट्स सांगेली कबड्डी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रुपये दहा हजार व स्मृती चषक तर उपविजेत्या संघाला रोख रुपये सहा हजार आणि स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धेमध्ये एकूण 15 संघाने सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक रियांश स्पोर्ट्स तेंडोली कबड्डी संघ आणि चतुर्थ क्रमांक श्री लक्ष्मीनारायण वालावल कुडाळ कबड्डी संघ यांनी प्राप्त केला. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक विजेत्या संघाला प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट पकड म्हणून मकरंद पाटकर (पंचक्रोशी जामसंडे), उत्कृष्ट चढाई सिराज भडसाळे (पंचक्रोशी जामसंडे) आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मयूर नाईक (गिरोबा स्पोर्ट्स सांगेली) यांची निवड करण्यात आली. यांना प्रत्येकी रोख रुपये पाचशे आणि चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर यांचे कबड्डी क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला तर स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण पंचायत समितीच्या नूतन सभापती प्रज्ञा चव्हाण, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नूतन पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, मनस्वी भोगावेकर, रिया बावकर, महेश बागवे,अशोक बागवे मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, प्रकाश ठाकूर, संजय ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धा निरीक्षक म्हणून नितीन हडकर पंचप्रमुख प्रीतम वालावलकर आणि स्पर्धेसाठी पंच म्हणून मधुकर पाटील, प्रशांत वारीक, किशोर पाताडे, जनार्दन बंगे, वसीम शेख, आप्पा मुंज, संदेश पाटकर, पंकज राणे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यशस्वी नियोजन पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले होते







