मुंबई, : शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी हँडबॉल खेळाच्या राज्यस्तरीय निवड चाचण्या १७ ते १९ ऑगस्ट २०२६दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड, नागपूर येथे होणार आहेत. पात्र खेळाडूंनी या चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
२०२६-२७ या वर्षासाठी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी यापूर्वी मे २०२६मध्ये सरळ प्रवेश आणि खेळनिहाय कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. आता पुन्हा राज्यस्तरावर निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.सरळ प्रवेश चाचणी १७ व १८ ऑगस्ट रोजी होणार असून, पात्र खेळाडूंनी १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चाचणीस्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. खेळनिहाय कौशल्य चाचणी १८ व १९ ऑगस्ट रोजी होणार असून, संबंधित खेळाडूंनी १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चाचणीस्थळी उपस्थित राहावे.
सरळ प्रवेश चाचणीसाठी राज्यस्तरीय पदक किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी किमान राज्यस्तरीय सहभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या चाचणीसाठी १९ वर्षांखालील खेळाडू पात्र असतील.चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी. तसेच संबंधित स्पर्धेचे प्राविण्य किंवा सहभाग प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. खेळाडूंनी योग्य स्पोर्ट्स किटसह चाचणीस्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (हँडबॉल) भूषण इंगळे यांच्याशी ७४४७६५४९८९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.







