मालवण, दि. प्रतिनिधी : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांची सायकल मॅरेथॉन व सायकल रॅली तसेच पारंपरिक भारतीय खेळांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनीय सामने घेण्यात आले.
सायकलिंगचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ‘ब्युटीज ऑन व्हील्स’ संस्थेचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. वराडकर हायस्कूल, कट्टा ते सावरवाड गणेश मंदिर या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
रॅलीमध्ये ‘ब्युटीज ऑन व्हील्स’चे अध्यक्ष डॉ. सोमनाथ परब यांच्यासह निलेश झाट्ये, प्रकाश सरमळकर, सुरेश कांबळी, जगदीश पेंडूरकर, सोनू पारकर, गणेश पारकर, रुपेश भोजने, अमित सावंत, निलेश हडकर आदी पदाधिकारी सहभागी झाले. सुमारे ७० सायकलिस्टनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ. सोमनाथ परब यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात नियमित व्यायाम आणि सायकलिंगचा समावेश करावा, असे आवाहन केले. मुख्याध्यापिका देवयानी धनंजय गावडे यांनी निरोगी शरीर, निरोगी मन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर, क्रीडाशिक्षक किसन हडलगेकर, पर्यवेक्षक महेश भाट तसेच समीर चांदरकर, भूषण गावडे, एकनाथ राऊळ, बाळकृष्ण वाजंत्री, नामदेव मासी, प्रवीण परुळेकर आणि रितेश जांभवडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमासाठी कट्टा पोलीस स्टेशनचे मोरे व मुल्ला, प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण तसेच ग्रामीण रुग्णालय, पेंडूर-कट्टा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सायकलिंग, व्यायाम आणि पारंपरिक खेळांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.







