मुंबई, दि. १२ : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
मंत्री राणे म्हणाले की, राज्यातील तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावांमधील गाळ काढण्याच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनात मोठी वाढ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
एआयच्या मदतीने तलावांची माहिती संकलित
राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात अनेक तलाव गेल्या ३० ते ४० वर्षांपासून विविध संस्थांना दिलेले आहेत. या तलावांमधील प्रत्यक्ष मत्स्य उत्पादनाची अचूक माहिती मिळावी यासाठी ‘मार्व्हेल’ कंपनीच्या सहकार्याने एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तलावांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या माहितीच्या आधारे संबंधित संस्था आणि तलावधारकांशी संवाद साधून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तलावातील गाळ काढल्यास उत्पादनात २०–३०% वाढ
मंत्री राणे यांच्या मते, तलावांमधील गाळ काढण्याचा उपक्रम राबविल्यास मत्स्य उत्पादनात थेट २० ते ३० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र देशात १६ व्या क्रमांकावर असून हे स्थान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू
राज्यात प्रथमच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत असून या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हास्तरीय अशा एकूण २८ नवीन योजना सुरू करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी १,०२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री राणे यांनी दिली.
गेल्या एका वर्षात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला असून केंद्र सरकारच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
वाढवण बंदर परिसरातील युवकांना प्रशिक्षण
वाढवण बंदर विकसित होत असताना पालघर जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. बंदर विकसित होण्यापूर्वीच परिसरातील युवकांना आवश्यक कौशल्ये देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.





