मुंबई : बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि निर्णयप्रक्रियेतील सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यात ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने ५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा उपक्रम राज्यभर राबविला जाणार आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, UNICEF आणि यशदा (YASHADA) यांच्या संयुक्त सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षम आणि संवेदनशील वातावरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
बालकांना सुरक्षित वातावरण, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, पुरेसे पोषण आणि विकासाच्या संधी मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या मतांना आणि सहभागालाही महत्त्व मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, अंगणवाडी केंद्रे, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच समाजातील सर्व घटकांनी या विशेष उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ या संकल्पनेच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, संवेदनशील आणि हक्काधिष्ठित स्थानिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.








