मालवण प्रतिनिधी –
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी जल महोत्सव 2026 या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम जर शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने (डीडीडब्ल्यूएस) आयोजित केला होता. जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार येथील ग्रामपंचायतीतून या कार्यक्रमात भाग घेतला.
जल अर्पण निमित्त महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांतही अशाच प्रकारचे जल महोत्सव कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या कर्ली गावात जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी जल महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये जल वॉक, समुदाय संवाद, जल पूजन, जल बंधन, तसेच गावातील जलसुविधा स्थळांना भेट देणे अशा उपक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमस्थळी जल श्रृंगार, फिल्ड टेस्ट किटच्या साहाय्याने पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीचे प्रात्यक्षिक, जल संकल्प आणि वृक्ष पूजन असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. तसेच स्वयंसहायता गटांचे सदस्य, ग्राम जल व स्वच्छता समिती, मिस्त्री, युवक स्वयंसेवक आणि पंप चालक यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच जल सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी थेट नळातून पाणी पिऊन त्याची चव उत्तम असल्याचे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची गुणवत्ता योग्य प्रकारे राखली जात असल्याने ते थेट पिण्यास योग्य आहे, कारण पुरवठ्यापूर्वी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
जल महोत्सव 2026, हा पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच जलशक्ती मंत्रालय यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला देशव्यापी उपक्रम आहे. 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण देशात हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनात समुदायाचा सहभाग वाढवणे आणि जलजीवन मिशन अंतर्गत जलसंवर्धनाला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.हा जल महोत्सव, दरवर्षी 8 ते 22 मार्च दरम्यान साजरा केला जाणार आहे.
“गावचा उत्सव, देशाचा महोत्सव” या घोषणेखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. गावपातळीवरील सामुदायिक प्रयत्नांमुळे शाश्वत जलव्यवस्थापनासाठी देशव्यापी चळवळ उभी राहते, हा संदेश या अभियानातून अधोरेखित होतो. या महोत्सवाच्या शुभारंभाने जल महोत्सव अंतर्गत देशव्यापी उपक्रमांची सुरुवात झाली. या उपक्रमात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर सामुदायिक स्वामित्व वाढवण्यासाठी गावे, जिल्हे आणि राज्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
ग्रामीण पिण्याच्या पाणी व्यवस्थापनात समन्वय आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी जल महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामपंचायत या चार स्तरांवर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेदरम्यान विविध मंत्रालयांमधील समन्वयाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तळागाळातील जल नेत्यांचा गौरव करण्यासाठी 11 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. या मोहीमेचा 22 मार्च रोजी, म्हणजेच जागतिक जल दिनानिमित्त देशभर जल अर्पण कार्यक्रमांनी समारोप होणार आहे.







