कोकणशक्ती मालवण- प्रतिनिधी
मालवण पंचायत समितीवर भाजप- शिवसेना महायुतीची निर्विवाद सत्ता आल्यावर आज पार पडलेल्या सभापती व उपसभापती निवडीत शिवसेनेच्या (शिंदे गट) पोईप मतदार संघातील सदस्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण यांची तर उपसभापतीपदी भाजपचे वायरी भूतनाथ मतदार संघातील सदस्य श्री. घनश्याम चंद्रकांत झाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
मालवण पंचायत समितीची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडल्यावर या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गट महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवत महायुतीचा भगवा फडकवला होता. यामध्ये पंचायत समितीच्या १२ जागांवर भाजपचे सहा व शिवसेनेचे सहा सदस्य निवडून आले होते. या निवडणुकीनंतर आज महिन्याभरानंतर मालवण पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पिठासन अधिकारी तथा तहसीलदार गणेश लव्हे यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रारंभी सकाळी महायुतीमधील निर्णयानुसार सभापती पदासाठी शिवसेनेच्या सदस्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर उपसभापतीपदी भाजपचे वायरी भूतनाथ मतदार संघांचे सदस्य घनश्याम झाड यांनी नामनिर्देशन दाखल केले. त्यानंतर दुपारी ३ अंतिम निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी प्रज्ञा चव्हाण यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी जाहीर केले. तसेच उपसभापती पदासाठी देखील घनश्याम झाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने झाड यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले. या निवडीनंतर तहसीलदार गणेश लव्हे व गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते प्रज्ञा चव्हाण व घनश्याम झाड यांना निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या निवडीनंतर इतर पं. स. सदस्य तसेच भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंदार लुडबे, जि. प. सदस्या सुमेधा पाताडे, पं. स. सदस्य छोटू ठाकूर, दीपक चव्हाण, दीपक सुर्वे, गणेश तोंडवळकर, संतोष गावडे, पं. स. सदस्या सीमा परुळेकर, रिया बावकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, मानसी भोगावकर, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, माजी उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, दाजी सावजी, मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी आदींनी सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.







