सिंधुदुर्गनगरी, : नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तहसिल कार्यालय, कणकवली येथे करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र या सेवा केवळ अभियानापुरत्या मर्यादित न ठेवता महसूल विभागाने वर्षभर नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, कर्णबधीर प्रमाणपत्र, फेरफार दाखले, सातबारा उतारे, जातीचे दाखले, शिधापत्रिका तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रमाणपत्र आदी सेवांचा समावेश होता.
या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा एकाच ठिकाणी करण्याची सोय करण्यात आली आहे. मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमधून ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, वारस नोंद, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जमीन विषयक तक्रारी, विविध महसूल विषयक अर्जांचे निपटारे यासह अनेक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार फेरफटका मारण्याची गरज भासणार नसून त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर नियोजित वेळापत्रकानुसार महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये महसूल विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करतील. या अभियानामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक करताना उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी अभियानाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. या अभियानांतर्गत महसूल विभागासह विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून फेरफार दाखले, शिधापत्रिका, विविध प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या शिबिरांचा सक्रियपणे लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, चैताली सावंत तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







