मालवण दि प्रतिनिधी
वायंगणी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत कालावल पुलाच्या खाली खाडीमध्ये झाडी झुडूपात आढळून आल्यानंतर या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरी पोलीस तपासाबाबत कोणीतीही माहिती समोर न आल्याने वायंगणी गावातील महिलांनी आज मालवण पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस तपासाबाबत पोलिसांना विचारणा करत या प्रकरणाचा तातडीने तपास करून अंतरा हिच्या मृत्यू मागील सत्य परीस्थिती समोर आणावी, यामध्ये कोणी दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीसांना दिले. तसेच तातडीने योग्य व समाधानकारक तपास न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल तसेच एका महिलेला न्याय मिळत नसल्याने महिला दिनावर बहिष्कार टाकू, असा इशाराही यावेळी महिलांनी दिला.
मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्याकडे वायंगणी मधील महिलांनी निवेदन सादर करत तपासाबाबत चर्चा केली. या निवेदनावर माजी सरपंच मालती जोशी, उपसरपंच समृध्दी आसोलकर, ग्रा. प. सदस्य संजना रेडकर, सोनाली वायंगणकर, अपर्णा देसाई, दिपिका राणे, क्षमा सावंत, वनिता राणे, वैशाली वायंगणकर, लीना सावंत, मंजिरी राणे, प्रज्ञा धुळे, रसिका सावंत, समृध्दी सावंत, स्वप्नाली बाईत, सुषमा सावंत, दीपांजली सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिक्षिका असणाऱ्या अंतरा दुखंडे या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये अत्यंत आदरणीय व विश्वासार्ह शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे वायंगणी गावात तसेच पंचक्रोशी परिसरात भीती, संभ्रम व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. विशेषतः गावातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक धक्का बसलेला असून महिलांमध्येही अस्वस्थता व भीतीची भावना निर्माण झालेली आहे. एकंदरीत गावाने एक कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षिका गमावल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या मृत्यूच्या घटनेला सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या तपास प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलीस यंत्रणेच्या तपासाबाबत असंतोषाची भावना वाढत आहे, असे महिलांनी निवेदनात म्हटले आहे.
सौ. अंतरा दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने, निष्पक्ष व पारदर्शक तपास होऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व मृत व्यक्तीस न्याय मिळावा, एका तरुण शिक्षिकेच्या मृत्यू प्रकरणात सत्य परिस्थिती स्पष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मृत व्यक्तीस न्याय मिळेल व समाजात निर्माण झालेली भीती दूर होईल. अंतरा हिच्या मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित पोलीस यंत्रणेला सखोल, निष्पक्ष व जलदगतीने तपास करण्याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत. तपास प्रक्रियेला आवश्यक ती गती देऊन मृत्यूचे वास्तविक कारण लवकरात लवकर जनतेसमोर स्पष्ट करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत. आवश्यक असल्यास या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरील विशेष पथक अथवा स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत. या प्रकरणात समाधानकारक व पारदर्शक तपास न झाल्यास वायंगणी गावातील महिला व ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल, एका महिलेला न्याय मिळत नसल्याने ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू तसेच गावच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकू, असेही यावेळी महिलांनी सांगितले.







