मालवण, दि. — प्रतिनिधी :
मराठी भाषा ही समस्त मराठी माणसांचा अलंकार असून ती ज्ञानाचे समृद्ध भांडार आहे. कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते, भाषा ही संवादाचे प्रभावी माध्यम असते. अभिजात मराठी भाषा टिकवण्यासाठी तरुण पिढीला मायबोलीत लेखन व वाचनासाठी प्रेरित करणे आवश्यक असून वाचन संस्कृती जोपासणे आणि दैनंदिन व्यवहारात मातृभाषेचा वापर वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेचे कुडाळ–मालवण तालुका समन्वयक बाजीराव काळे यांनी केले.
कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी होते. व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश वाईरकर, संचालक तथा वराडकर हायस्कूल कट्टा स्कूल कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, उपप्राचार्य रविंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य रविंद्र गावडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी मराठी ही केवळ भाषा नसून ती आपली ओळख आणि अस्मिता असल्याचे सांगितले. कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करत संत व साहित्यिकांनी केलेल्या विपुल लेखनामुळे मराठी भाषा समृद्ध झाली असून हा अमूल्य वारसा जपणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. संचिता करावडे, कु. प्राची परब आणि कु. सिद्धी जांभवडेकर यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्य योगदानाबाबत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कदम यांनी केले तर प्रा. वैशाली पालव यांनी आभार प्रदर्शन केले.







