मालवण (प्रतिनिधी) आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीप्रति माणुसकी असणे गरजेचे आहे. माणूस आणि माणुसकी, जाण आणि जाणीव, योजना आणि योजनाबद्धता ही तीन सूत्रे महत्वाची असून माणुसकीची जाण असल्यावर समस्यांची जाणीव होऊन विविध योजनाच्या माध्यमातून त्या समस्या सोडविता येतात. योजना राबविण्यासाठी योजना बद्धता महत्वाची असून शासनाच्या विविध योजना या केवळ कागदावरती न राहता त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहचणे गरजेचे असून हाच आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी मालवण येथे बोलताना केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती, मालवण, जिल्हा मुलकी व पोलीस प्रशासन, सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर रविवारी मालवण येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी व्यापीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती, सिंधुदुर्ग श्याम चांडक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती फरहान दुभाष, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व संविधानाच्या फलकाला पुष्प अर्पण करून तसेच वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणच्या सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी न्यायमूर्ती श्याम चांडक म्हणाले, राज्य घटना आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली असून आपण ती आज राबवित आहोत. शासकीय सेवा व योजनांचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. तुम्हाला कोणती गोष्ट कधी मदत करेल हे महत्वाचे आहे. आज येथे मांडलेल्या योजनांचे ज्ञान घेऊन लाभ घ्यावा. समाजाप्रति जोपर्यंत आपण जागरूक होत नाही, एकमेकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आपली इच्छा नसेल तर आपण प्रगती कडे जाऊ शकत नाही. समाज प्रगत झाला तर आपली दिशा प्रगतशील राहणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा कमी लोकसंख्येचा जिल्हा असला तरी येथील लोक बुद्धीवान व जागरूक आहेत असे सांगत येथील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सोयी सुविधा व योजना याबाबत माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर देशापांडे यांनी न्याय हा समाजाचा पाया आहे, आणि सेवा ही त्याची खरी शक्ती आहे, या दोन मूल्यांवर आपला समाज उभा राहिला पाहिजे, आजचा कार्यक्रम हा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसाठी आशेचा, विश्वासाचा आणि अधिकारांचा नवा अध्याय ठरेल, असे सांगितले.
यावेळी अॅड. संग्राम देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनीही विचार मांडले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध योजनाच्या लाभार्थीना लाभाचे व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठाच्या समोरील भागात पार्थ मेस्त्री, समीर चांदरकर, श्रेया चांदरकर यांनी रेखाटलेली न्याय व्यवस्था व संविधानाचे प्रतिक दर्शविणारी रांगोळी पाहून मान्यवर न्यायमूर्तीनी कौतुक केले.
यावेळी कार्यक्रम स्थळी विविध शासकीय विभाग, सेवा व योजनाचे, विविध बचत गट व हस्तकला व्यावसायिकांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलना न्यायमूर्ती व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. रुपेश परुळेकर व न्यायाधीश एस. जे. पाटील यांनी केले. तर आभार मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड सतीशकुमार धामापूरकर यांनी केले.







