मालवण दि. प्रतिनिधी :
किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ अंतर्गत तृषा इन्फोटेक व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा शुभारंभ बुधवार दि. ४ मार्चपासून करण्यात येणार आहे.
या अंतर्गत फॅशन डिझाइन, स्ट्रीट फूड वेन्डर तसेच मेकअप आर्टिस्ट या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना याचा लाभ घेता येणार आहे.
युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडेल असे व्यावसायिक ज्ञान प्रदान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. तीन महिन्यांच्या कालावधीचे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून दि. ४ मार्च ते ४ जून २०२६ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी असून प्रवेशासाठी आधारकार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व शैक्षणिक प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सौ. राजश्री सावंत, अॅड. नकुल पार्सेकर तसेच अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तानावडे उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते (मो. ८३८१०२२५२९) व रघुनाथ तानावडे (मो. ९४२२९०२३६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे व प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी केले आहे.







