मालवण : प्रतिनिधी
मराठी भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांच्या साहित्याने मराठी वाङ्मय समृद्ध केले आहे. काव्य, नाटक, कादंबरी, ललित लेखन तसेच समीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणिवा जागृत केल्या. कुसुमाग्रजांचे साहित्य आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने त्यांचे साहित्य अवश्य वाचावे, असे प्रतिपादन मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय चे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले.
महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला प्राचार्य राबते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. हंबीरराव चौगले, प्रा. संग्रामसिंह पवार, एम. आर. खोत, प्रा. देविदास हारगिले तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. प्रारंभी प्रा. हंबीरराव चौगले यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना प्राचार्य राबते म्हणाले की, मराठी भाषा ही आपल्या मातेप्रमाणे असून प्रत्येकाने या मायमराठीवर प्रेम केले पाहिजे. लहानपणापासून आपण ज्या भाषेत बोलायला शिकलो त्या भाषेचे ऋण जपणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार वाढविणे ही काळाची गरज असून स्पर्धेच्या युगातही मराठी भाषेचे महत्त्व अबाधित राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रा. स्नेहा बर्वे व प्रा. संग्रामसिंह पवार यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन महाविद्यालयात भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मनीषा इंगळे यांनी केले.







