मालवण, दि. प्रतिनिधी : ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना सन १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून तो त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा सर्वोच्च गौरव आहे. समाजातील वंचित घटकांविषयी असलेली संवेदनशीलता, तसेच समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा प्रभावी पुरस्कार त्यांच्या साहित्यामधून दिसून येतो. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे अढळ आहे, असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जॉईंट ट्रेझर अभिमन्यू कवठणकर होते.
यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, केळबाई देवी मंदिर ट्रस्टचे शरद मयेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, सहाय्यक शिक्षिका सौ. संजना सारंग, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक तिवले यांनी स्वागत केले, तर सौ. संजना सारंग यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
तहसीलदार गणेश लव्हे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. स्पर्धांमधील सहभागातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. भंडारी हायस्कूल विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात अभिमन्यू कवठणकर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत भंडारी हायस्कूलच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीन लाख तीन हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांचा अभिमन्यू कवठणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित हस्ताक्षर स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. डी. बनसोडे यांनी केले.







