Mega Legal Services Camp featuring government schemes and public services will be held on March 1 at Topiwala High School, Malvan, in the presence of Bombay High Court judges and district officials.
मालवण (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती मालवण, जिल्हा मुलकी व पोलीस प्रशासन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आज रविवार दि. १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.
या महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या हस्ते होणार असून न्यायमूर्ती फरहान दुभाष यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई तसेच जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष अॅड. परिमल नाईक उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मोहम्मद फकीह यांनी केले आहे.
दरम्यान, महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. टोपीवाला हायस्कूल परिसरात केवळ प्रमुख पाहुणे व उच्चपदस्थ मान्यवरांसाठी व्हीव्हीआयपी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून येथे इतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी व वकील संघ सदस्यांच्या वाहनांसाठी रोजरी स्कूल, मालवण येथे स्वतंत्र व्हीआयपी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी कन्या शाळा, मालवण येथे पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाहनतळ व्यवस्थेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी प्रत्येक पार्किंग स्थळी आरटीओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







