कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रचारांची रणशिंगे वाजत असताना, भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि सर्व १७ नगरसेवक उमेदवारांनी घेतलेले खासदार नारायण राणे यांचे शुभाशीर्वाद हा निवडणूक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीने मागील काही दिवसांपासून शहर विकास आघाडीच्या प्रमुख आघाडीकडून भाजपमधील अंतर्गत बंडाळीची आम्हाला साथ हा दावा फोल ठरला असून खासदार नारायण राणे यांनी विरोधकांना फटकारत आपण भाजपच्याच उमेदवारांमागे उभे असल्याचा स्पष संदेश दिला आहे.
खासदार नारायण राणे यांनी उमेदवारांशी संवाद साधताना “माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा आहे; इतर कोणालाही नाही.” अशा शब्दात दिलेला आशीर्वाद हा विरोधकांसाठी चपराक मानली जात आहे. राणे यांनी दिलेले विजयाचे मंत्र, जनतेपर्यंत पोहोचवायच्या विकासाच्या भूमिका, प्रचारातील भेदक मुद्दे आणि संघटनात्मक समन्वय या सर्व बाबींवरील त्यांच्या मार्गदर्शनामुळे कणकवली भाजप उमेदवारांमध्ये नव्या उर्जेचा संचार झालेला स्पष्ट दिसतो.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आता समीकरणे अधिक स्पष्ट झाली आहेत. एकीकडे संपूर्ण नेतृत्वाचा पाठिंबा मिळालेली भाजपची संघटित ताकद, तर दुसरीकडे शहर विकास आघाडीचा स्थानिक नेत्यांवर सुरु असलेला प्रचार या दोन पर्यायातून हळूहळू कणकवलीतील जनमताची दिशा कोणाकडे झुकते आहे याचे उत्तर लोकांच्या चर्चेतूनच उमटू लागले आहे.समीर नलावडे आणि सर्व १७ नगरसेवक उमेदवारांसाठी हा आशिर्वाद म्हणजे विजयाचा पॉवरबुस्टर मानला जात आहे.
त्याचवेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणारी ही कणकवली नगरपंचायत निवडणूक ही भाजप उमेदवारांनाही “विकासकेंद्रित कारभारासाठी आमची जबाबदारी अधिक वाढली आहे” याची जाणीव करुन देणारी ठरली आहे.







