कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे समीकरण आज अधिक तीक्ष्ण झाले आहे. चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेनंतर कणकवलीतील प्रमुख लढत ‘कमळ विरुद्ध नारळ’ अशी ठरली असून, राजकीय रंगमंचावर नवीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांना राष्ट्रीय पक्षाच्या हक्काचे कमळ हे अधिकृत चिन्ह आधीच मिळाले होते. आज शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर आणि लोकराज्य जनता पार्टीचे गणेश प्रसाद पारकर यांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया संपन्न झाली.
दोन्ही उमेदवारांनी कप-बशी या चिन्हाची मागणी केल्याने चिठ्ठी उडवण्यात आली. त्यात
- गणेश प्रसाद पारकर (लोकराज्य जनता पार्टी) यांना कप-बशी
- तर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर, जे क्रांतिकारी विचार पक्षाच्या तिकिटावर लढत आहेत, यांना नारळ हे चिन्ह देण्यात आले.
यामुळे शहर विकास आघाडीच्या सर्व १७ नगरसेवक उमेदवारांनाही एकाच नारळ चिन्हाखाली निवडणूक लढवण्याचा मार्ग साफ झाला.
पूर्वी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी एकसमान चिन्ह देण्याबाबतची बंधनकारकता नव्हती. पण नवीन सूचनांनुसार नोंदणीकृत पक्षांना दोन्ही पदांसाठी एकच चिन्ह देणे आवश्यक असल्याने शहर विकास आघाडीला ‘दुहेरी चिन्ह’ मिळण्याची शक्यता बाद झाली आहे.
आज निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात अधिकृत चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली, ज्यात शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार नारळ या एकाच चिन्हाखाली उभे राहणार असल्याचे निश्चित झाले.
या चिन्ह वितरणानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीची मुख्य लढत आता अधिक स्पष्ट झाली आहे—
👉 भाजपचे कमळ
VS
👉 शहर विकास आघाडीचा नारळ
एकीकडे भाजपची संघटित यंत्रणा आणि कमळाची ओळख, तर दुसरीकडे क्रांतिकारी विचार पक्षाच्या माध्यमातून उभे राहिलेले संदेश पारकर आणि त्यांची नारळ चिन्हावरची मोहीम—
यामुळे कणकवलीतील राजकीय वातावरण तापले आहे,
आणि मतदारांचे लक्ष आता या थेट द्विपक्षीय लढतीकडे वेधले गेले आहे.
कणकवलीतील नगरपंचायत रणांगण आता अधिक रंगतदार होणार हे निश्चित!







