मालवण (प्रतिनिधी) : हडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मालकीच्या उत्पन्न देणाऱ्या आंबा झाडे व कलमांच्या कथित तोडीप्रकरणी चार महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थ मयूर करंगुटकर यांनी पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ मयूर करंगुटकर यांनी ग्रामपंचायत मालकीच्या आंबा झाडांच्या तोडीविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी संबंधित प्रकरणासह ग्रामपंचायतीच्या इतर कारभाराची १५ दिवसांत चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. तसेच महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.
या प्रकरणी मालवण पोलिस ठाण्याकडूनही चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने करंगुटकर यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र चार महिने उलटूनही ना चौकशी झाली ना कोणतीही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करंगुटकर यांनी केला आहे.
येत्या दहा दिवसांत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास पूर्वी स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा मयूर करंगुटकर यांनी दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी, मालवण तहसीलदार तसेच मालवण पोलिस ठाणे यांना देण्यात आले आहे.







