मालवण (प्रतिनिधी) : समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे येथील कु. सानिका सत्यवान राऊळ हिने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
‘घरघर संविधान’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन गटासाठी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील वैश्विका नागेश कदम हिने द्वितीय, तर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील शितल अनिल पवार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेचे परीक्षण बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी दिली.
या यशाबद्दल सानिका राऊळ हिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.







