मालवण (प्रतिनिधी) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबविण्यात येत असलेल्या नशा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ मालवण शहरात उत्साहात करण्यात आला. मालवण नगरपालिका येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी चलचित्राच्या माध्यमातून तसेच जनजागृतीपर पत्रकांचे वितरण करून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. या अभियानांतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची जनजागृतीपर चलचित्र दाखविणारी विशेष व्हॅन मालवण शहरात दाखल झाली असून शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांना भेटी देत नशामुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शुभारंभ कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरपालिका कर्मचारी तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या डॉ. भारती बेहेन, वर्षा दीदी, निलिमा दीदी, राखी दीदी, मेघा दीदी, नूतन दीदी यांच्यासह अशोक, नारायण व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारती बेहेन यांनी नशा मुक्त भारत अभियानाची माहिती देताना देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. समाजाला व्यसनांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धेच्या युगात तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आपले भविष्य घडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तरुणांनी व्यसनमुक्त व तणावमुक्त जीवन जगावे यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून नगरपालिकेचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरपालिका अधिकारी हेमराज चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करत अभियानास शुभेच्छा दिल्या.







