सिंधुदुर्गनगरी, दि. १ मार्च : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कायदेविषयक सेवा शिबिराच्या निमित्ताने मालवण तालुक्यात प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी एकूण ४५ रिक्त पदांसाठी ही प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कुडाळ येथील लक्ष्मी नारायण होंडा येथे मेकॅनिक (आयटीआय मेकॅनिक/डिप्लोमा मेकॅनिक), सेल्स एक्झिक्युटिव्ह (१०वी/१२वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर) तसेच बॅक ऑफिस असिस्टंट (कोणत्याही शाखेतील पदवीधर व एमएससीआयटी प्रमाणपत्र) या पदांसाठी एकूण २५ जागा उपलब्ध आहेत.
तसेच कुडाळ येथील बजाज शोरूममध्ये बॅक ऑफिस असिस्टंट (कोणत्याही शाखेतील पदवीधर व एमएससीआयटी प्रमाणपत्र), सेल्स एक्झिक्युटिव्ह (१०वी/१२वी किंवा पदवीधर) आणि मेकॅनिक (आयटीआय मेकॅनिक/डिप्लोमा मेकॅनिकल) पदांसाठी एकूण २० जागा उपलब्ध आहेत.
सदर प्लेसमेंट ड्राईव्ह प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे.
ही स्थानिक युवक-युवतींसाठी उत्तम रोजगार संधी असून जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ईमेल : sindhudurgrojgar@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८३५ येथे संपर्क साधावा.






