मालवण, दि. प्रतिनिधी : मालवण येथील दांडी किनाऱ्यावर दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेल्या धोकादायक विजवाहिनीमुळे स्थानिक व्यावसायिक, पर्यटक तसेच मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत नागरिकांनी मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे लक्ष वेधल्यानंतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सौ. आचरेकर यांनी मालवण वीज वितरण विभागाचे अभियंता सचिन मेहेत्रे यांच्यासमवेत दांडी किनाऱ्यावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खाली झुकलेली विजवाहिनी पर्यटक व मच्छिमारांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आले.
दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरू असून अलीकडील काळात ही वाहिनी खाली आल्याने किनाऱ्यावर वावरणाऱ्या नागरिकांसाठी संभाव्य धोका निर्माण झाला आहे. आगामी पर्यटन हंगामात दांडी किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने सदर विजवाहिनी तातडीने सुरक्षित उंचीवर नेऊन सुस्थितीत ठेवावी, अशी मागणी सौ. आचरेकर यांनी अभियंता मेहेत्रे यांच्याकडे केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीजवाहिनीच्या खांबांबाबत काम सुरू असून संबंधित कंत्राटदारामार्फत पुढील आठ ते दहा दिवसांत ही विजवाहिनी सुरक्षित उंचीवर नेण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आल्याची माहिती अभियंता सचिन मेहेत्रे यांनी दिली.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







