महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. राज्याच्या जडणघडणीच्या इतिहासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘ रिअल स्टार’ आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित दिवंगत अजित यांच्या श्रद्धांजली सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर , विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी सरन्यायाधिश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी, अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, मंत्रीमंडळातील मंत्री, विधानसभा आणि विधानपरिषदे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकसभेत म्हणाले, दिवंगत अजित पवार हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची माहिती त्यांना होती. उत्तम प्रशासकासाठी जे गुण आवश्यक असले पाहिजे ते संपूर्ण गुण अजितदादांमध्ये होते. त्यांनी केवळ अर्थसंकल्प मांडले नाहीत, तर त्यामधून राज्याला आर्थिक शिस्त लावली. लोकहिताचे निर्णय घेताना आर्थिक घडी विस्कटू नये, याची कटाक्षाने काळजी ते घ्यायचे. मंत्रिमंडळासमोर येताना त्यांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास असायचा. प्रचंड निर्णय क्षमता असल्यामुळे ते तात्काळ निर्णय घेत दिलेला शब्द ते कधीही परत घ्यायचे नाहीत. ते परखडही होते.
उत्तम प्रशासन चालविण्याचे त्यांचे कौशल्य होते. त्यासाठी आवश्यक असलेली जरब त्यांच्याकडे होती. नेमकेपणा, शिस्त हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. राज्याच्या हिताचे नसलेले निर्णय ठामपणे रद्द करण्याचे त्यांचे धाडसही अनुभवले आहे. सार्वजनिक जीवनात त्यांचा जनसंपर्क होता, यासोबतच वैयक्तिक संबंध ठेवण्यातही त्यांची हातोटी होती.
यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मुलं पार्थ व जय यासह पवार कुटुंबीयाच्या सांत्वनसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावरील आणि राजकीय कौटुंबिक क्षेत्रातील कारकीर्द यावर चित्रफितीं प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.







