मुंबई : प्रतिनिधी
मुंबई येथील अवतरण अकादमीच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘नाट्यगुरु डॉ. कृ. रा. सावंत नाट्यव्रती अवतरण सन्मान’ यावर्षी संस्कृती फाउंडेशन, लांजा (जि. रत्नागिरी) चे संस्थापक, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते राजेश गोसावी यांना जाहीर करण्यात आला आहे.
संभाजी सावंत आणि विजय लाड यांनी कलेच्या निस्सीम सेवाभावातून २७ मार्च १९९९ रोजी स्थापन केलेल्या अवतरण अकादमीमार्फत हा पुरस्कार दरवर्षी नाट्यक्षेत्रात व्यावसायिक चौकटीबाहेर राहून किशोर व युवावर्गामध्ये नाट्यकलाविषयी अभिरुची निर्माण करणाऱ्या आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नाट्यधर्मी व्यक्तीस प्रदान केला जातो.
राजेश गोसावी हे सन २००७ पासून वंचित व ग्रामीण पार्श्वभूमीतील युवक-युवतींमध्ये नाट्यसंस्कार रुजविण्याचे कार्य निस्वार्थ भावनेतून सातत्याने करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अकादमीने त्यांची निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये ११ हजार, मानपत्र, मानचिन्ह व श्रीफळ असे आहे.
जागतिक नाटक दिनानिमित्त सोहळा
दि. २६ मार्च रोजी मुंबई येथे आयोजित ‘जागतिक नाटक दिन’ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय नाट्यकर्मी संदेशाचे वाचन तसेच अवतरण अकादमीच्या कलाकारांचा नाट्यप्रयोगही सादर होणार आहे.
यापूर्वी दादा कोंडके पारितोषिक विजय कदम, संतोष पवार, संतोष सुदाम लिंबोरे यांना तर नाट्यव्रती सन्मान संजय हळदीकर, हरीश इथापे, डॉ. राजेंद्र चव्हाण, अभीत झुंजारराव आणि प्रमोद शेलार यांसारख्या नामवंत नाट्यकर्मीना प्रदान करण्यात आला आहे.
राजेश गोसावी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, सचिव विनोद बेनकर, संघटक सिद्धेश पांचाळ, प्रियवंदा जेधे तसेच नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
२८ वर्षांची सांस्कृतिक परंपरा
अवतरण अकादमी गेली २८ वर्षे कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय काव्यरचना, कथालेखन, अभिनय, पटकथा लेखन, गीतलेखन व वाचन संस्कार कार्यशाळांसह विविध राज्यस्तरीय सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली अनेक नाटके, एकांकिका व लघुपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहेत.
या सांस्कृतिक सोहळ्यास जास्तीत जास्त रंगकर्मी व नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी सावंत व विजय लाड यांनी केले आहे.







