मालवण | प्रतिनिधी
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे सादर झालेल्या ‘आमने सामने’ या नाटकाच्या कलाकारांनी नाट्यगृहातील अस्वच्छता व मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाची नगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.

नाट्यगृहातील अस्वच्छतेवर प्रशासनाची झाडाझडती
नगराध्यक्ष वराडकर यांनी नगरसेवक व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत नाट्यगृहाची सखोल तपासणी करत अस्वच्छता, अपुरी सुविधा आणि देखभालीतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही झाडाझडती घेत तातडीने आवश्यक सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान नाट्यगृहातील खुर्च्या, आसनव्यवस्था, दरवाजे, एसी, पंखे, रंगमंच परिसर यांची तपासणी करण्यात आली. तुटलेल्या खुर्च्यांची दुरुस्ती, रंगमंच परिसरातील अडगळीचे साहित्य हटविणे तसेच नाट्यगृहाच्या मागील बाजूस साचलेले भंगार, दगडधोंडे आणि बांधकाम साहित्य तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले.

ड्रेसिंग रूम व स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
ड्रेसिंग रूममधील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची खराब स्थिती, तुटलेल्या लाद्या व खिडक्यांच्या तावदानांकडे नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत त्वरित स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. नाट्यगृह परिसरातील सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी तसेच मद्यपींचा वाढता वावर रोखण्यासाठीही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाट्यगृह डागडुजीसाठी १ कोटींचा निधी
मामा वरेरकर नाट्यगृहाच्या सर्वांगीण डागडुजीसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. वराडकर यांनी दिली. संबंधित प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार असून नाट्यगृह सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत चिंता
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नाट्यगृहाच्या सध्याच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त करत आवश्यक असल्यास आमदार तसेच मुख्यमंत्री स्तरावरही हा विषय मांडला जाईल, असे सांगितले.

पाहणीवेळी उपस्थित मान्यवर
या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक मंदार ओरसकर तसेच राजू बिडये, राजा गावकर, शेखर गाड यांच्यासह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








