Hindu Janajagruti Samiti submitted a memorandum to Malvan Tehsildar demanding a strict anti–love jihad and anti–illegal conversion law in Maharashtra on the lines of Uttar Pradesh and Uttarakhand.
मालवण (प्रतिनिधी)
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तातडीने संमत करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांना सादर करण्यात आले.
गंभीर घटनांचा उल्लेख
समितीने निवेदनात काही अलीकडील घटनांचा उल्लेख केला आहे. श्रद्धा वालकर, रबिका पहाडन तसेच कर्नाटकातील नेहा हिरेमठ यांच्या हत्यांचा संदर्भ देत, या घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाच्या नसून महिलांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा असल्याचे समितीने म्हटले आहे. हा केवळ प्रेमसंबंधांचा विषय नसून संघटित षडयंत्र असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या
निवेदनातून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
- ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा होईल असा अजामीनपात्र कायदा लागू करावा
- प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करावे
- अशा प्रकरणांचा निकाल सहा महिन्यांत लागावा यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करावीत
- राज्यातून बेपत्ता असलेल्या १,७८,४०० हून अधिक महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी
- धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाहापूर्वी किमान ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज व पोलीस चौकशी बंधनकारक करावी
यावेळी रत्नाकर कोळंबकर, दिनानाथ गावडे, किर्ती नाचणोलकर, रिमा कामत, साक्षी मयेकर, शांती तेंडुलकर, शिल्पा खोत, गौरी गवाणकर, अमृता फाटक, जान्हवी चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








