Malvan Municipal Health Chairperson Poonam Chavan conducted an on-site inspection at Dhurivada Sai Mandir area and took immediate action to clean garbage and sewage, warning citizens of strict penalties for violations.
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील धुरीवाडा साईमंदिर परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला कचरा आणि सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत मालवण पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत तातडीची धडक कारवाई केली. पाहणीदरम्यान त्यांनी केवळ परिस्थितीची पाहणी न करता कर्मचाऱ्यांकडून त्वरित परिसर स्वच्छ करून घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला.
सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पूनम चव्हाण यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून शहरातील स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्नांवर काम सुरू केले आहे. धुरीवाडा भागात साचलेल्या कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी स्थानिक नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर तसेच स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह परिसराचा दौरा केला.
पाहणीदरम्यान अनेक नागरिक आपले सांडपाणी थेट उघड्या गटारांमध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. या प्रकारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत सभापती पूनम चव्हाण यांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत.
शहरात घंटागाडीची सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे. यावर उपाय म्हणून सभापती चव्हाण यांनी कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरातून कचरा उचलण्यात आला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
“शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. घंटागाडीचा वापर करा आणि स्वच्छतेसाठी सहकार्य करा,” असे आवाहन आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.
या धडक मोहिमेमुळे धुरीवाडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







