Newly elected Zilla Parishad member Yadnya Devdatt Salgaonkar, a teacher at Pat High School, was felicitated by the institution, expressing gratitude for the values she learned as a student and her commitment to social service.
कुडाळ (प्रतिनिधी):- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत यश संपादन करून नवनिर्वाचित जि. प. सदस्या म्हणून निवड झालेल्या सौ. यज्ञा देवदत्त साळगावकर यांचा पाट हायस्कूलमध्ये संस्था व विद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी बोलताना सौ. यज्ञा साळगावकर म्हणाल्या, “मी याच शाळेची विद्यार्थिनी आहे. येथे मिळालेले संस्कार आणि मूल्येच माझ्या आजच्या यशामागे कारणीभूत ठरली आहेत. या शाळेने दिलेल्या शिकवणीला न्याय देत मला मिळालेल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन.”
यज्ञा साळगावकर या सध्या पाट हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील अनुभवासोबतच सामाजिक जाणिवेमुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. काळे सर यांनी शुभेच्छा देताना, “सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकशाहीच्या मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी सुशिक्षित आणि संवेदनशील उमेदवार जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये असणे आवश्यक आहे. सौ. साळगावकर यांच्या हातून समाजोपयोगी कार्य घडो,” अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
संस्थेच्या वतीने कार्यवाह विजय ठाकूर, संचालक राजेश सामंत यांनीही सौ. साळगावकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था प्रतिनिधी बाबा तळवळेकर, सुधीर मळेकर, दीपक पाटकर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करता येतो, हा संदेश या कार्यक्रमातून मिळाला आहे.







