Akkalkot Shri Swami Samarth Vatvruksha Devasthan president Mahesh Ingle will visit Vayangani Math in Malvan taluka on February 10 to interact with devotees; Mahaprasad and palanquin ceremony scheduled.
मालवण (प्रतिनिधी):
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश कल्याणराव इंगळे हे दि. १० फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठास भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्वामी भक्तांची श्रद्धा तसेच अक्कलकोट येथील तीर्थक्षेत्र स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी श्री. इंगळे भाविकांशी संवाद साधून अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्यदिन पूजा-अर्चा, तसेच मठात वार्षिक साजरे होणारे विविध धार्मिक सण व उपक्रमांची माहिती देणार आहेत. या निमित्ताने सकाळी ११ वाजता त्यांचे वायंगणी येथे आगमन होणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, दि. १२ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी येथे अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका परिक्रमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता पालखीचे मठात आगमन होणार असून सकाळी ९ ते ११ या वेळेत भाविकांसाठी दर्शन व प्रसाद वाटप केले जाणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.








