BJP district president Prabhakar Sawant expresses confidence of 100% victory for the BJP–Shiv Sena Mahayuti in Sindhudurg Zilla Parishad and Panchayat Samiti elections; Samir Prabhugavkar joins BJP in Malvan’s Masure area.
मालवण | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप–शिवसेना महायुतीच्या तब्बल २५ जागा बिनविरोध विजयी झाल्या असून हा महाराष्ट्रातील एक विक्रम असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले. खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कम असून येत्या निवडणुकीत महायुतीचा शतप्रतिशत विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी मालवण तालुक्यातील मसुरे येथे व्यक्त केला.
निवडणूक निकालाच्या दिवशी आंगणेवाडी भराडी देवीचा जत्रोत्सव असून देवीचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी राहील, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.
दरम्यान, माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभुगावकर यांचे पुतणे मसुरे येथील समीर प्रभुगांवकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मसुरे येथील भाजप विभागीय कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार क्षमा संदीप हडकर, कोळंब पंचायत समिती उमेदवार योजना जयराम कांबळी, तालुका सचिव महेश मांजरेकर, उद्योग व्यापार आघाडी तालुका अध्यक्ष रोहेश गांवकर, शक्ती केंद्र प्रमुख बंडू गावडे, यासीन सय्यद, बूथ अध्यक्ष अमरेश सावंत, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, आबा पालव, मंदार परब, स्वप्नील ठाकूर, प्रशांत साळुंखे, रुपेश मेस्त्री, माजी सरपंच संदीप हडकर, शिवाजी परब, पराग खोत, ओंकार दुखंडे, यश शिरसाट, संदेश सांगवेकर, महेश शिंदे, रुपेश दुखंडे, विक्रांत प्रभुगांवकर यांसह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले की, मसुरे येथील प्रभुगावकर घराण्याला राजकीय वारसा असून समीर प्रभुगांवकर यांचा भाजपात प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा आहे. जिल्ह्यात सर्वत्र भाजपात प्रवेश होत असून महायुती अधिक मजबूत होत आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकसंघपणे काम करत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यातील सर्व जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे. मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातील क्षमा हडकर व पंचायत समिती उमेदवार छोटू ठाकूर, योजना कांबळी हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनीही महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर उमेदवार क्षमा हडकर यांनी जनतेच्या आशीर्वादाने आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून निश्चितच विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार जगदीश चव्हाण यांनी मानले.







