Former MP Vinayak Raut appeals to voters in Malvan to defeat money power in Zilla Parishad and Panchayat Samiti elections and support loyal Shiv Sena (UBT) candidates for people-centric development in Achra and Chinder areas.
मालवण | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही केवळ सत्तेसाठीची लढाई नसून ती धनशक्तीविरोधात सर्वसामान्य जनतेची आणि निष्ठावंत शिवसैनिकांची निवडणूक आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी मैदानात उतरून सामान्य जनतेतील तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व सिंधुदुर्ग–रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.
आचरा जिल्हा परिषद आणि चिंदर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार आढावा बैठकीत विनायक राऊत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार संजना सचिन रेडकर, चिंदर पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार समीर सुनील लब्दे, आचरे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार लवू नारायण मालडकर, नगरसेवक मंदार ओरोसकर, उमेश मांजरेकर, युवा सेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, नारायण कुबल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, ही लढाई सत्ताधाऱ्यांच्या अमाप पैशांच्या बळाविरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेची आहे. पैशाच्या जोरावर मत विकत घेण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मात्र जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता, या निवडणुकीचा गांभीर्याने विचार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावे.
आचरा, चिंदर आणि परिसरातील स्थानिक प्रश्न, विकासकामांचा अनुशेष, ग्रामविकासासाठी आवश्यक असलेले नियोजन यावरही यावेळी चर्चा झाली. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार सर्वसामान्य जनतेतून आलेले असून गावागावातील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनतेने निष्ठावंत आणि प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असेही राऊत यांनी सांगितले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांची कणा मजबूत करणारी निवडणूक असून ग्रामीण विकासाचा पाया याच निवडणुकांमधून घातला जातो. त्यामुळे मतदारांनी विकासाभिमुख भूमिका घेत योग्य उमेदवारांची निवड करावी, असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही केले.







