BSNL network disruption in Malgaon Bagayat, Malvan for two months causes OTP failures, affecting gas booking, ration services, traders, and locals.
मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील माळगाव–बागायत परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बीएसएनएल नेटवर्क पूर्णतः विस्कळीत झाले आहे. या भागात अन्य कोणत्याही मोबाईल नेटवर्कची उपलब्धता नसल्यामुळे बीएसएनएल हाच नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे. मात्र, परिसरात असलेला बीएसएनएल टॉवर प्रत्यक्षात उपयोगी ठरत नसून, सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना दैनंदिन कामांसाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
OTP-आधारित सेवांवर परिणाम; गॅस, रेशन व्यवहार ठप्प
सध्या गॅस सिलेंडर बुकिंग, रेशन वितरण, बँकिंग व विविध शासकीय सेवांसाठी OTP अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी स्थिर मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची नितांत गरज असते. मात्र, बागायत बाजारपेठेत नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना तासनतास थांबूनही OTP मिळत नाही, परिणामी आवश्यक असलेले सिलेंडर बुकिंग व इतर व्यवहार रखडत आहेत.
व्यापारी व रिक्षा व्यावसायिकांना फटका
नेटवर्क अभावी UPI/डिजिटल पेमेंट्स, कॉल्स आणि ऑनलाईन ऑर्डर्स ठप्प होत असल्याने बागायत परिसरातील व्यापारी तसेच रिक्षा व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार प्रभावित झाले आहेत. ग्राहकांशी संपर्क साधणे, भाडे/पेमेंट स्वीकारणे यामध्ये अडचणी येत असून व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अडचणी वाढण्याची भीती
बागायतपासून जवळच असलेल्या आंगणेवाडी श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या यात्रेसाठी बागायत, माळगाव, खेरवंद, भोगलेवाडी परिसरातील तसेच मुंबईहून अनेक भाविक गावी येतात. यात्रेदरम्यान नेटवर्क समस्या कायम राहिल्यास भाविक, व्यापारी व स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी
बीएसएनएलच्या वारंवार खंडित होणाऱ्या सेवेमुळे आपत्कालीन संपर्क, आरोग्यविषयक मदत, शासकीय व्यवहार यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे बीएसएनएल विभागाने व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने बागायत परिसरातील नेटवर्क समस्येची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी माळगाव–बागायत परिसरातील बीएसएनएल ग्राहकांनी केली आहे.
नेटवर्क सेवा पूर्ववत झाल्यास दैनंदिन व्यवहार सुलभ होतील आणि यात्रोत्सव काळात उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.








