Mahayuti candidate Sonali Sunil Ghadigaonkar takes the lead in Adavali Maldy Zilla Parishad constituency, Malvan, due to well-planned election campaign and strong local leadership support.
मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने राबविलेल्या प्रचारयंत्रणेमुळे त्या आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सोनाली घाडीगावकर निवडणूक रिंगणात उतरल्या असून मतदारांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आडवली मालडी हा मतदारसंघ १९९० पासून माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या पाठराखण करणारा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सभापती सुनील घाडीगावकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली घाडीगावकर यांनी गेली अनेक वर्षे या भागात लोकसंपर्क आणि विकासकामांच्या माध्यमातून भक्कम नेतृत्व उभे केले आहे.
या मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने यश मिळाले होते. या यशामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह सुनील घाडीगावकर आणि माजी उपसभापती राजू परुळेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
नियोजनबद्ध प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद
सौ. सोनाली घाडीगावकर यांच्या प्रचारासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभारण्यात आली असून गेल्या आठ दिवसांत पहिली प्रचारफेरी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विकासाला गती देण्याचे आश्वासन
प्रचारादरम्यान बोलताना सौ. घाडीगावकर यांनी सांगितले की, केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळात रखडलेली विकासकामे मार्गी लावणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे.
“केंद्र व राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्यामुळे निधी आणि विकासकामांना गती देणे सोपे होणार आहे. मतदारांनी मला संधी दिल्यास आडवली मालडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.







