All India Marathi Women Government Officers Literary Conference 2026 will be held on 7–8 March at Maharashtra Sadan, New Delhi. Organized by Sarhad Pune and Maharashtra Sadan to promote literary talent among women officers.
नवी दिल्ली, प्रतिनिधी –
प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी ७ आणि ८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिले ‘अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत या संमेलनाची अधिकृत घोषणा संमेलनाच्या निमंत्रक तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांनी केली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि ‘सरहद’चे सह-संयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.
महाराणी ताराराणी जयंती वर्षाचे औचित्य
हे संमेलन महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे. प्रशासनात विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या मराठी महिला अधिकाऱ्यांमधील सुप्त साहित्यिक गुणांना प्रोत्साहन देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच प्रशासकीय कामकाजासोबत सर्जनशीलतेची जपणूक करणाऱ्या महिलांचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटनासाठी मान्यवरांना निमंत्रण
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत
आणि माजी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर
यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तीन समांतर सभागृहांत भव्य आयोजन
हे साहित्य संमेलन अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून, एकाच वेळी तीन समांतर सभागृहांमध्ये विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत.
- सभागृह १ : सामाजिक व साहित्यिक परिसंवाद, चर्चासत्रे आणि मान्यवरांच्या मुलाखती
- सभागृह २ : निमंत्रित कवींचे भव्य काव्य संमेलन
- सभागृह ३ : पुस्तक प्रकाशन, गझल सादरीकरण व विविध सांस्कृतिक कार्यक्रम
या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांच्या लेखन, कविता, विचारमंथन व सांस्कृतिक अभिव्यक्तीला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
नोंदणीसाठी आवाहन
देशभरातील विविध राज्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या मराठी महिला शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडतानाच साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांसाठी हे संमेलन एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
📝 नोंदणी व संपर्क माहिती
संकेतस्थळ : sahityasammelan.sarhad.in
संपर्क : लेशपाल जवळगे (सह-संयोजक, सरहद) – 📞 ८४८४०५५२५२








