Scholarship Exam 2026: Maharashtra State Examination Council extends deadline for Class 4 and Class 7 scholarship exam registration and online application till 13 February 2026.
मुंबई, दि. ३ :
राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) दि. २६ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
विद्यार्थी व शाळांना अर्ज भरण्यास अधिक वेळ मिळावा, यासाठी परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शाळा माहिती प्रपत्र, विद्यार्थी आवेदनपत्र व शुल्क भरण्यासाठी नियमित शुल्कासह १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सुधारित अर्ज वेळापत्रक (Revised Schedule)
परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार –
- नियमित शुल्कासह अर्ज : १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत
- विलंब शुल्कासह अर्ज : १४ ते २० फेब्रुवारी २०२६
- अतिविलंब शुल्कासह अर्ज : २१ ते २४ फेब्रुवारी २०२६
- अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज : २५ ते २८ फेब्रुवारी २०२६
२८ फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
पालक व शाळांसाठी महत्त्वाची सूचना
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची नोंदणी होत असल्याने शाळांनी वेळेत नोंदणी पूर्ण करून विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत तसेच पालकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळते.







