Kudal News: Deputy CM Eknath Shinde addresses massive Mahayuti rally in Kudal ahead of ZP and Panchayat Samiti elections; appeals to voters to elect Mahayuti candidates with huge majority.
कुडाळ (सिंधुदुर्ग), प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट जनसभेला शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितले की, केंद्रात व राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील विकासकामांना गती मिळाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास यांसारख्या क्षेत्रांत भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, येत्या काळात कुडाळ–मालवण परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
या विराट जनसभेला कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, माजी आमदार रविंद्र फाटक, प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, सर्व उमेदवार, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान नेत्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी महायुतीला सक्षम बहुमत देण्याचे आवाहन केले. विशेषतः कुडाळ–मालवण मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची गती यापुढेही कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीची सत्ता आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या विराट जनसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महायुतीच्या घोषणांना प्रचंड दाद मिळाल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कुडाळ तालुक्यात महायुतीला मोठा जनसमर्थन मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.







