mumbai News: Shivaji Fire Station chief firefighter Prakash Redkar from Malvan and Bharat Parab from Pendur Raivadi awarded Municipal Commissioner Silver Medal for bravery.
मालवण, प्रतिनिधी :
मालवणचे सुपुत्र व मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी अग्निशमन केंद्राचे प्रमुख अग्निशामक श्री. प्रकाश बाळकृष्ण रेडकर यांना असामान्य शौर्याबद्दल सन २०२५–२६ साठी महानगरपालिका आयुक्तांचे रजत पदक व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळाल्याने मालवण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर पेंडूर रायवाडी गावचे सुपुत्र व सांताक्रुज पश्चिम अग्निशमन दलातील अग्निशामक भरत जनार्दन परब यांनाही रजत पदक व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे. मालवण तालुक्यातील या दोन्ही सुपुत्रांनी बजावलेल्या धैर्यशील कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने अग्निशमन दलात उल्लेखनीय व धाडसी कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी आयुक्तांचे रजत पदक जाहीर करण्यात येते. या पदकांचे वितरण अग्निशमन सेवा सप्ताह किंवा राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते.
सलग दुसऱ्यांदा प्रकाश रेडकर यांचा सन्मान
गतवर्षी सायन–बांद्रा लिंक रोडवर सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात प्रकाश रेडकर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या धाडसाबद्दल त्यांना भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रजत पदक जाहीर झाले होते.
यंदा ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा प्रकाश रेडकर यांना महापालिका आयुक्तांचे रजत पदक व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे.
१६ जून २०२३ रोजी हाजी अली येथील कोस्टल रोड प्रकल्पात लागलेल्या भीषण आगीत जीव धोक्यात घालून प्रकाश रेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शौर्याने आग आटोक्यात आणली होती. या कामगिरीसाठी विभागीय अग्निशमन अधिकारी देवेंद्र पाटील, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी दत्तात्रय शितोळे, वरिष्ठ केंद्र अधिकारी महेश जाधव, प्रमुख अग्निशामक सुभाष येवले, अग्निशामक दत्तात्रय खुस्पे, ज्ञानेश्वर निगोट, कृष्णकुमार बांदिवडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मालवण शहरातील गवंडीवाडा–मक्रेबाग येथील मूळ रहिवासी असलेले प्रकाश रेडकर हे भंडारी ए. सो. हायस्कूल, मालवण आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या या यशामुळे मालवणकरांना अभिमान वाटत आहे.
पेंडूरच्या भरत परब यांनाही रजत पदक
३ मार्च २०२५ रोजी सांताक्रुज पश्चिम मुंबई येथील कुमकुम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, चिरानगर येथे लागलेल्या आगीत प्रमुख अग्निशामक भरत जनार्दन परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने आग आटोक्यात आणली होती. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भरत परब यांना रजत पदक व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे.
या मोहिमेत त्यांच्या समवेत सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी सचिन तळेकर, वरिष्ठ केंद्र अधिकारी नवीन काळे, केंद्र अधिकारी अभिजित तांडेल, मंगेश सोनावणे, अग्निशामक इब्राहिम शेख, गणेश घोडके, सूरज अमरे यांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनाही महापालिका आयुक्तांच्या वतीने सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पेंडूर रायवाडी गावातील भरत परब यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह संपूर्ण मालवण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








