Malvan News: Shiv Sena district chief Datta Samant claims 100% success for Mahayuti in ZP and Panchayat Samiti elections; action against rebels in Zarap and Sukalwad.
मालवण, प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला १०० टक्के यश मिळणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र महायुतीच्या बाजूने अनुकूल वातावरण आहे, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर फडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक पार्श्वभूमीवर दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग संपर्क मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व उमेदवार एकसंघपणे, नियोजनबद्ध प्रचार करत आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे सरकार असून राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेला जनतेचा कौल हा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कायम राहील, असा दावा त्यांनी केला.
सिंधुदुर्गात महायुतीचा झेंडा फडकणार
दत्ता सामंत यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद जागांवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. विरोधकांकडून फारसे आव्हान नसल्याचे चित्र दिसत असून जनता विकासाभिमुख भूमिकेतून महायुतीच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मालवण–कुडाळ मतदारसंघात महायुती मजबूत
मालवण–कुडाळ मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू व कार्यतत्पर नेतृत्व लाभले आहे. प्रत्येक अधिवेशनात त्यांचा आवाज घुमत असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदारसंघात येत असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. मालवण–कुडाळ मतदारसंघातील १५ जिल्हा परिषद व ३० पंचायत समिती जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
झाराप येथे बंडखोरी; अनिकेत तेंडोलकर यांचे निलंबन
कुडाळ तालुक्यातील झाराप मतदारसंघात अनिकेत तेंडोलकर यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने पक्षशिस्तीच्या अनुषंगाने त्यांचे शिवसेना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती दत्ता सामंत यांनी दिली. याबाबत मित्रपक्ष भाजपच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचा पाठिंबा फक्त अधिकृत उमेदवारांनाच असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सुकळवाड येथे अधिकृत उमेदवार संतोष गावडे
सुकळवाड पंचायत समिती मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष गावडे आहेत. येथे अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले प्रसाद मोरजकर यांच्याशी महायुतीचा कोणताही संबंध नाही, असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले. मोरजकर यांनी यापूर्वी उबाठा पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता; मात्र सध्या त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. प्रचारादरम्यान नेत्यांची नावे वापरणे चुकीचे असून महायुतीचा अधिकृत पाठिंबा संतोष गावडे यांनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.








