Malvan News: Mahayuti candidate Sonali Ghadigaonkar intensifies door-to-door campaign in Advali-Maldi constituency ahead of ZP and Panchayat Samiti elections in Malvan taluka.
मालवण, प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून मालवण तालुक्यात प्रचाराला जोर चढला आहे. तालुक्यातील आडवली–मालडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार सोनाली घाडीगांवकर यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आडवली–मालडी मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुनील घाडीगांवकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्चस्व राहिले आहे. यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघाने महायुतीला मोठे मताधिक्य दिले असून यावेळीही महायुतीच्या उमेदवारास भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आडवली–मालडी मतदारसंघात निरोम, मठबुद्रुक, बुधवळे, कुडोपी, श्रावण, रामगड, गोठणे, किर्लोस, असगणी, राठीवडे, घाडीवाडी, हिवाळे, शिरवंडे, असरोंडी, ओवळीये या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये सोनाली घाडीगांवकर यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास आदी विषयांवर त्यांनी आपली भूमिका मांडत विकासात्मक कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात या मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रलंबित राहिल्याने त्याचा फटका सामान्य ग्रामस्थांना बसला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सध्या राज्यात व केंद्रात एकाच विचारसरणीचे सरकार असल्यामुळे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात विकासाची गती वाढली आहे.
ही विकासाची घडी पुढेही वेगाने सुरू राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आडवली–मालडी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.







