मालवण प्रतिनिधी :
“साने गुरुजी कथामालेकडून मिळालेला शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील मानाचा पुरस्कार असून या सन्मानाची प्रतिष्ठा राखून मुलांसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं. १ येथील पदवीधर शिक्षिका श्रीमती रसिका राजेंद्र तेंडोलकर यांनी केले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या वतीने देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच साने गुरुजी सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, आचरे येथे आयोजित समारंभात रसिका तेंडोलकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटी आचरेचे अध्यक्ष जॅकारिएस फर्नांडिस होते. प्रमुख अतिथी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, आचरेचे मुख्याध्यापक अंकुशराव घुटुगडे उपस्थित होते. तसेच बाबाजी भिसळे, प्रकाश पेडणेकर, अशोक कांबळी, सुरेश ठाकूर, सुगंधा गुरव, सुरेंद्र सकपाळ, सुरेश गावकर, सदानंद कांबळी, ज्ञानदेव तेली, राजेंद्र तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत पांडुरंग कोचरेकर यांनी केले. मुख्याध्यापक अंकुशराव घुटुगडे यांनी कथामालेचे उपक्रम विद्यार्थी व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करत, अशा पुरस्कार सोहळ्यांतून सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित होते, असे सांगितले. अध्यक्ष जॅकारिएस फर्नांडिस, सुरेश गावकर आणि ज्ञानदेव तेली यांनीही समायोचित भाषणे केली.
सत्कारमूर्ती श्रीमती रसिका तेंडोलकर यांना कथामालेच्या वतीने शाल, श्रीफळ, ग्रंथभेट, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५,००० रुपये प्रदान करण्यात आले. हा सन्मान कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन अनघा कदम यांनी केले.
या सोहळ्यानिमित्त ज्ञानदेव तेली, शंकर गोसावी, अस्मिता ठाकूर या शिक्षकांचा तसेच वनिता घाडीगावकर, गायत्री गावकर यांचा कथामाला मालवणच्या वतीने ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
साने गुरुजी कथामालेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कथामाला अंकाचे प्रकाशन सदानंद कांबळी सर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे कथामालेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिरुद्ध आचरेकर, सायली परब, रमाकांत शेट्ये, माधव गावकर, चंद्रशेखर धानजी, उज्ज्वला धानजी, त्र्यंबक आजगावकर, संजय परब, कामिनी ढेकणे, छाया त्रिंबककर, मृणालिनी आचरेकर, चंद्रकला दिवेकर, स्मिता जोशी, अमृता मांजरेकर, मधुरा माणगावकर, नेहा बापट तसेच कथामाला सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र कुबल यांनी केले तर आभार प्रदर्शन परशुराम गुरव यांनी केले.







