मुंबई :
कोकणातील पाच जिल्ह्यांतील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष सर्वेक्षण व सीमांकन करण्यात येणार असून, यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत आपला सविस्तर अहवाल राज्य शासनास सादर करणार आहे.
या प्रक्रियेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कोळीवाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष पाहणीद्वारे सर्वेक्षण करून त्यांच्या सीमांकनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार आहेत. संबंधित पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य असणार आहेत.
मात्र, मुंबई शहर व उपनगरांतील कोळीवाड्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे कोकणातील पारंपरिक कोळीवाड्यांच्या जमिनींना अधिकृत मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून स्थानिक कोळी समाजाला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







