मालवण : आचरा-वरचीवाडी येथील मूळ रहिवासी, बँक ऑफ इंडिया डोंबिवली शाखेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी, ज्येष्ठ नाट्यकर्मी तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष उर्फ बाळ वसंत सामंत-नेवाळकर (वय ६८) यांचे मुलुंड, मुंबई येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने आचरा परिसरासह डोंबिवली आणि मुंबईतील मित्रपरिवार व सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संतोष सामंत-नेवाळकर यांचा नाट्य क्षेत्राशी जवळचा संबंध होता. ते सहयोग प्रतिष्ठान, डोंबिवलीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सांस्कृतिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभागी होत असत.
बँक ऑफ इंडियाच्या डोंबिवली शाखेत शाखाधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी पर्यटन व्यवसायातही योगदान दिले. आचरा परिसराशी असलेली त्यांची नाळ कायम राहिली होती. आचरा येथील मालवणी बझारची शाखाही त्यांच्या निवासस्थानी भाडेतत्त्वावर सुरू आहे.
मितभाषी, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध ठेवणाऱ्या संतोष सामंत-नेवाळकर यांचा मित्रपरिवार मोठा होता. सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला स्नेहसंबंध त्यांच्या जाण्याने कायमची पोकळी निर्माण करणारा ठरला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा परिसरासह विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.








