सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेचा सलग १४व्या वर्षी उपक्रम
मालवण : गणेश चतुर्थीच्या सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे २४०० महिला सभासदांना ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कडधान्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने सलग १४व्या वर्षी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
आचरा विभागातील महिला मत्स्यव्यावसायिकांना कडधान्य वाटपाच्या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर, संस्थेचे संस्थापक तथा गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, गौरी सारंग, सुमाली चोपडेकर, रंजना खराडे, आदित्य केरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मत्स्यव्यावसायिक उपस्थित होत्या.
यावेळी स्नेहा केरकर म्हणाल्या की, संस्थेची स्थापना झाल्यापासून गेली १४ वर्षे गणेश चतुर्थीच्या सणात आर्थिकदृष्ट्या गरजू मच्छीमार महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याला महिलांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी प्रत्येक महिला सभासदाला १० किलो कडधान्याचे वाटप करण्यात आले.
कर्ली, पाट, परुळे, केळूस, देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली, दांडी, धुरीवाडा, मालवण शहर, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, तोंडवली, रेवंडी, आचरा आदी किनारपट्टी भागातील गावांमधील सुमारे २४०० महिला सभासदांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा
संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या १४ वर्षांत महिला मत्स्यव्यावसायिकांच्या व्यवसायातील अडचणी दूर करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य सुविधांसाठी प्रयत्न करण्यात आले. मासे विक्रीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी धरणे आंदोलन आणि आक्रोश मोर्चांच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेने पाठपुरावा केला. तसेच गरजू महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य शासनाच्या मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या ५ हजार रुपयांच्या नि:शुल्क अपघाती विमा योजनेचा महिला मत्स्यव्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. चतुर्थीनंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिकांची विमा योजनेसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिक महिलांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रशेखर उपरकर यांनी केले.







